नवी दिल्ली- रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज महाराष्ट्रातील दोन नव्या रेल्वेमार्गांना मंजुरी दिली. यात ब-याच वर्षांपासून नागरिकांची व औद्योगिक क्षेत्राकडून सातत्याने मागणी होणा-या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली. याचबरोबर मनमाड ते इंदूर या रेल्वेमार्गालाही मंजुरी देण्यात आल्याची घोषणा बन्सल यांनी आज लोकसभेत केली.
मनमाड- इंदूर या नव्या रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील औद्योगिक क्षेत्रासह दळण-वळणाला मोठा फायदा होणार आहे. नाशिक-पुणे या स्वतंत्र मार्गाची ब-याच वर्षापासूनची मागणीही अखेर बन्सल यांना मान्य करावी लागली आहे. पुणे आणि नाशिक ही दोन शहरे महाराष्ट्रातील दुस-या व तिस-या क्रमांकाची शहरे आहेत. याचबरोबर वेगाने विकसित होणा-या देशातील टॉप-१० शहरातही पुणे-नाशिकचा समावेश आहे.
बन्सल यांनी मागील महिन्यात मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची तक्रार राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी व खासदारांनी केली होती. यात काँग्रेसच्या खासदारांचाही समावेश होता. त्याची दखल घेत अखेर बन्सल यांनी महाराष्ट्रावर झालेला अन्याय काही प्रमाणात भरुन करताना मध्यप्रदेशलाही गोंजारले आहे. इंदूर शहरही वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे या शहराची कनेक्टिविटी मनमाडद्वारे महाराष्ट्राशी जोडली जाणार आहे.

No comments:
Post a Comment