Thursday, 7 March 2013

दिल्लीत पुन्हा धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार


नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत महिलांवरील अत्याचाराचे प्रकार कमी होताना दिसत नाहीये. दिल्लीच्या वेलकम भागात मंगळवारी रात्री २५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर काळी काच असलेल्या धावत्या कारमध्ये सामुहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या तीन दिवसांत बलात्काराच्या चार घटना उजेडात आल्या आहेत. यामध्ये एका युवतीबरोबर तीन अल्पवयीन मुली अत्याचाराचे बळी ठरले आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार येथे राहणा-या पीडित मुलीचा पतीबरोबर वाद झाल्यापासून ती भजनपुरा भागात एकटी राहत होती. गामडी गावातील यशदेवने तिला नोकरी देण्याच्या बहाण्याने न्यू जाफराबाद पार्क येथे बोलावले. पीडित मुलगी सुमारे सात वाजता तिथे पोहोचली. दोघांनी तिथे काहीवेळ चर्चा केल्यानंतर सोबत असलेल्या तरूणाने तिला थंडपेयात अंमली पदार्थ टाकून ते पिण्यास दिले. पीडित मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर त्याने तिला कारमध्ये नेले. कारमध्ये आधीपासूनच बसलेल्या तीन लोकांनी आणि त्या तरूणाने पीडित मुलीवर सामुहिक बलात्कार केला. रात्री दोन वाजता पीडित मुलीला एका कचराकूंडीजवळ फेकून ते फरार झाले. पोलिसांनी पीडित मुलीला रूग्णालयात दाखल केले. आणि तिच्या जबाबावरून यशदेव या संशयितास ताब्यात घेतले.

दिल्लीमध्ये गेल्यावर्षीपर्यंत दररोज सरासरी दोन बलात्काराचे गुन्हे नोंद होत होते. यावर्षी दररोज चार तक्रारीची नोंद होत असल्याचा खुलासा राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या एका अहवालात म्हटले आहे. याप्रकरणातील बहुतांश आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे असतात, असेही या अहवालात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment