लखनौ - पोलिस उप अधीक्षक झिया-उल-हक यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशमधील आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) दाखल केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने या प्रकरणी आज (गुरुवार) एकूण चार एफआयआर दाखल केले आहेत. बलीपूर गावचे प्रमुख नन्हे यादव आणि त्यांच्या भावाच्या हत्येनंतर झालेल्या हिंसाचारात पोलिस उप अधीक्षक हक यांचा मृत्यू झाला होता.
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये राजा भैया यांच्यासह ओम श्रीवास्तव, गुलशन यादव, गुड्डू सिंह आणि रोहित सिंह यांची नावे आहेत. त्यामुळे आता सीबीआय राजा भैया यांना चौकशीसाठी ताब्यात घेते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयच्या दहा अधिकाऱ्यांचे पथक आज प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा येथे आले होते.
हक यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली होती. तसेच त्यांनी नन्हे यादव यांच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेशही दिला आहे.
No comments:
Post a Comment