वॉशिंग्टन- 'इंडिया फस्र्ट' ही माझी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे. अतिशय सोपी अशी ही व्याख्या आहे. तुम्ही काहीही करा, भारताला सर्वोच्च प्राथमिकता हवी. कोणताही धर्म आणि विचारधारेपेक्षा देशाला सर्वोच्च स्थान आहे, असे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अमेरिकतील भारतीय नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला. काही दिवसांपूर्वी व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमने मोदी यांना मुख्य वक्ता बनण्याचे निमंत्रण देऊन त्यांचे भाषण रद्द केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओवरसीज फ्रेण्ड्स ऑफ बीजेपीने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एडिसन, न्यूजर्सी, शिकागो आणि इलिनॉयस याठिकाणच्या नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मोदींनी यावेळी विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
मोदींना धर्मनिरपेक्षतेबाबत विचारण्यात आले. त्यावर ते उत्तरले. माझ्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे इंडिया फस्र्ट. धर्मनिरपेक्षताची व्याख्या अगदी सोपी आहे. तुम्ही कोणतेही काम करा, काहीही करा, भारताचाच विचार सर्वप्रथम आला पाहिजे. देशाच्या भल्याशिवाय इतर कोणतेही ध्येय नको. हे घडले की धर्मनिरपेक्षता आपोआपच तुमच्या रक्तात भिनते.
मोदी म्हणाले की, गुजरातच्या विकासाची जगभरात चर्चा होत आहे. अमेरिकेत मंदी असताना गुजरातमध्ये विकास होत होता. विकास केला की जनता माफ करते. आम्ही चुका केल्या नाहीत, असे नाही. पण विकास झाल्यावर जनता माफ करते, असे मोदी म्हणाले.
मोदींनी आपल्या भाषणात गुजरातच्या विकासाची प्रचंड स्तुती केली. गुजरातमध्ये पर्यटनाचाही मोठा विकास व्हावा, अशी अपेक्षा मोदींनी केली. अमेरिकेतील जनतेला त्यांनी पर्यटनासाठी गुजरातमध्ये यावे, असे आवाहनही केली. मोदींनी भाषणात व्हार्टनबाबतचा उल्लेख टाळला. युपीए सरकारवरही टीका करण्याचे टाळले.

No comments:
Post a Comment