नवी दिल्ली- दामिनी गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपी रामसिंगच्या आत्महत्येवरून वाद आणखी चिघळला आहे. रामसिंगच्या कुटुंबिय आणि वकीलाने हा खूनाचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालानुसार फास बसल्यामुळेच रामसिंगचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. रामसिंगच्या शरीरावर आणि मानेवर बोटांचे ठसे दिसून आल्याचे त्याच्या भावाने म्हटले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे सांगितले.
रामसिंगच्या वडीलांनी तर रामसिंगची हत्या करून त्याला फासावर लटकविण्यात आल्याचा आरोप केला. याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. रामसिंगचा खून करण्यात आल्याचा दावा त्याच्या भावाने केला. तो म्हणाला,ङ्कमाझ्या भावाची हत्या करण्यात आली आहे. मला त्याच्या शरीरावर जखमा आणि गळयाभोवती बोटांचे निशाण दिसून आले आहे.ङ्क रामसिंगवर राजस्थानमधील त्याच्या करोली गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मात्र, तिहार तुरूंगाच्या अधिका-यांनी रामसिंगच्या खूनाचा आरोप फेटाळला आहे. तुरूंगाचे संचालक विमला मेहरा यांनी न्यायालयीन चौकशीत सर्व उत्तरे मिळतील असे म्हटले आहे. सोमवारी रामसिंगला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. उल्लेखनीय म्हणजे गेल्या १५ महिन्यात तिस-या कैदीने तिहारमध्ये आत्महत्या केली आहे. दरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबियांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, ते निराश नाहीत. इतर चार आरोपींना फाशी शिक्षा मिळण्याची ते वाट पाहत आहेत. या आरोपींमध्ये रामसिंगचा भाऊ मुकेशसिंगचाही समावेश आहे.
मंगळवारी एम्समध्ये रामसिंगचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला होता. एम्स रूग्णालयातील मॉर्चरी मेडिकल बोर्डने पोस्टमॉर्टम केले. त्यानंतर रामसिंगचा मृतदेह त्याच्या कुटुंबियाकडे सोपवण्यात आला. सोमवारी आवश्यक ती कागदपत्रे देण्यास तुरूंग प्रशासनास अपयश आल्यामुळे रामसिंगच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करता आला नव्हता.

No comments:
Post a Comment