मुंबई- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) मराठीसह इतर प्रादेशिक भाषांना दुय्यम स्थान देऊन मराठी मुलांवर अन्याय केला आहे, त्याविरोधात महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी राजकीय मतभेद विसरून एकत्रित आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमूख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
मराठीला दूर सारण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. गेल्या काही वर्षांत युपीएससीमध्ये मराठी टक्का वाढल्याने मुद्दामहूनच हे षडयंत्र रचण्यात आले आहे. द्रमुकच्या खासदारांनी याप्रश्नी संसदेत गोंधळ केला. आता महाराष्ट्रातील खासदारांनी एकत्रित येण्याची गरज आहे. मनसेचे आमदार विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर यासंबंधी प्रश्न विचारतील. मराठी मुलांना मराठीतूनच पेपर सोडवायला मिळाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दबाव आणला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही मग त्यासाठी का आग्रह केला जातोय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मातृभाषेतून उत्तरे लिहावयाची असतील तर, एकाच वेळी पदवी परीक्षाही त्याच माध्यमातून दिलेली असणे, तसेच त्या भाषेतून उत्तरे लिहिणारे किमान २५ उमेदवार असणे अशा अटी आयोगाने लादल्या आहेत. हे नियम इंग्रजी अथवा हिंदी ही मातृभाषा असलेल्या उमेदवारांना लागू नाहीत. प्रा. डी.पी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशी आयोगाने स्वीकारल्या आहेत. आयोगाच्या या निर्णयावर देशातील अनेक राजकीय पक्षांनी व संघटनांनी टीका करून त्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

No comments:
Post a Comment