Friday, 10 May 2013

अतिरेक्यांची काटेकोर नजर, समाजाचे दुर्लक्ष !


माझे बालपण समुद्राच्या कुशीत गेले आहे. तो विशाल समुद्र... घोंघावत येणा-या उंचच उंच लाटा... तो गंभीर ध्वनी ऐकत ऐकतच माझे लहानपण गेले. आमच्या घरच्या परिसरात डोंगर आणि झाडी होती. 

अलिबागजवळील रेवस हे माझे गाव. लाँचमधून रेवस धक्क्यावर उतरली की येणारे पहिलेच गाव. गाव पहिले पण घर मात्र शेवटचे. आणि घराच्याच पाठीमागे भलामोठा समुद्र. तर या समुद्राकडे पाहतच मी लहानाची मोठी झाले. फिरायला समुद्रावर, खेळायला समुद्रावर.. समुद्र हेच आमच्या आगरी-कोळ्यांचे जीवन होते. लहानांसाठीसुद्धा आणि मोठ्यांसाठीही. आमच्या उपजिवीकेचे तेच प्रमुख साधन. समुद्रातील मासे पकडायचे आणि ते विकून जे पैसे येतील त्यातूनच दोन वेळेचं जेवायला मिळायचं.

माझ्या वडिलांनी तर स्वत:चे तसेच त्यांच्या छोट्या भावांचे शिक्षणदेखील मासे विकूनच पूर्ण केले, असे पप्पांच्या बोलण्यातून एक-दोनदा ऐकू आले होते. परंतु माझे शालेय जीवन आठवले की अजूनही मनात आनंदाच्या लाटा उसळतात. पहिलीत होती मी तेव्हा. आमच्या गावातच शाळा होती आणि शाळेच्या पाठीमागे एक भलेमोठे चिंचेचे झाड होते. तसे शाळेच्या बाहेर चिंचवाला असायचाच, पण झाडावरच्या ताज्या चिंचेचा स्वाद काही निराळाच. म्हणून मधल्या सुट्टीत आम्ही त्या चिंचेच्या झाडाजवळ जायचो. पण लहान असल्यामुळे मला झाडावर काय चढता यायचे नाही. त्यामुळे माझ्यापेक्षा वयाने व उंचीने मोठी असलेली मुले झाडावर चढली की, जसा कोल्हा कावळ्याच्या तोंडातील माशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत असतो तसेच आम्हीही त्यांच्याकडे बघत असायचो. ‘ए दादा, एक चिंच दे ना‘ म्हणत. कधी मिळायची, तर कधी... असो...

दिवसभराच्या या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात असलो तरी कधी एकदा खेळायला समुद्रावर जायला मिळेल, असे वाटे. रोज संध्याकाळी मी खेळायला समुद्रावर जायचे. तसा आमच्या घरातूनही समुद्र दिसायचा, पण जोपर्यंत त्याच्या कुशीत जावून त्याच्या लाटांसोबत मनसोक्त खेळायला मिळत नव्हते, तोपर्यंत मनाला समाधान मिळायचे नाही. मात्र तेव्हाच समुद्रकिना-याच्या पलिकडील मुंबईतील उंचच उंच इमारती दिसायच्या. त्यावेळी एकच स्वप्न होते, आपणही एक दिवस मुंबईला जावू. दुरूनच या मायावी नगरीचे दर्शन घेत असताना त्या समृद्ध मुंबईत कधी राहायला मिळेल. हाच विचार मनात घेवून मी घरी परतायचे. अनेक वर्षे लोटली आणि एक दिवस उजाडला तो मला मुंबईला घेवून जाण्यासाठीच !

माझ्या वडिलांना मुंबईत नोकरी लागली होती. आम्हाला सर्वांना घेवून ते मुंबईला जाणार होते. मी खूप आनंदात होती. रोज दुरवरून न्याहाळणाèया मुंबईचे अखेर मला जवळून दर्शन घडले. त्यानंतर माझे पुढील शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. आज गेली १५ वर्षे मी मुंबईत राहत आहे. परंतु गावाबद्दल वाटणारी ती ओढ अजूनही संपलेली नाही. म्हणून प्रत्येक सुट्टीत आजही आम्ही सगळे लाँचमध्ये बसून गावी जातो. गावातून मुंबई दिसायची. पण मुंबईतून कधीच मला माझे गाव दिसले नाही. आज मला त्या ‘संध्याकाळ‘ची आठवण येते, जेव्हा मी रोज समुद्रावर खेळायला जायचे. पण मुंबईच्या या व्यस्त जीवनशैलीत गुरफटले गेल्यावर जवळ असूनही आता कसला समुद्र आणि कसलं काय... एक मात्र चांगलं आहे. आज जेव्हा पण मला मुंबईतून माझ्या गावी जावेसे वाटते, तेव्हा मी लाँचमधून सहज जावू शकते. ते अस्तित्वात असलेल्या सागरी मार्गामुळेच. तो म्हणजे भाऊचा धक्का ते रेवस...

मात्र आता मुंबईतील गर्दी, प्रचंड वाहतूक आणि अत्यंत कष्टदायक धावपळीचे जीवनाचा अनुभव घेत असताना, आपल्या गावी जाण्याची उत्कंठा लागते. मात्र येथील परिवहन चक्रात रोज फेरे मारताना मुंबईत आणि एकूणच महाराष्टड्ढात रस्तेवाहतूक, रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक या सर्वच वाहतुकीच्या साधनांच्या विकासाच्या प्रमाणात जलवाहतुकीचे नगण्य आहे हे जाणवते. खरे तर मुंबई शहराला तिन्ही बाजूंनी समुद्रकिना-याने वेढले आहे. जवळच्या ठाणे  शहरालाही पश्चिम किनारपट्टीवरील वसई, विरार, डहाणू, नालासोपारा या भागांतून जलमार्गाने प्रवास करणे शक्य आहे. तसेच ठाण्यापासून वाशी, बेलापूरपट्टीतून थेट गेट वे ऑफ इंडिया किंवा मुंबईच्या भाऊच्या धक्क्यापर्यंत जलवाहतूक करणे शक्य असले तरी एकेकाळी शिडावरून चालणा-या गलबतातून ठाण्याच्या मीठबंदरापर्यंत मोठ्या प्रमाणावर भर समुद्रातून मासेमारी करण्यासाठी जाणा-या बोटी येत असल्या तरी, सध्या ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

एका गोष्टीचे वैषम्य वाटते, कोलकात्यामध्ये मुख्य स्टेशन हावडा येथून खाली पाय-या उतरल्या की जगातील अभियांत्रिकी क्षेत्रतील एक भव्य वास्तू म्हणून हुगळी नदीवरील प्रख्यात पोलादी हावडा ब्रीज समोर दिसतो. मात्र या पुलावरून कोलकाता शहराच्या मुख्य भागात जायचे तर प्रचंड गर्दी आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे तासभर लागतो. त्याऐवजी कोलकातातील प्रवासी स्टेशनच्या पाय-या उतरून भराभर नदीकिनारी असणा-या हुगळी नदीतील उभ्या असणा-या बोटीत चढतात आणि १०-१५ मिनिटांतच पलिकडील किना-यावर मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. तसेच गोव्यात पणजी ते म्हापसा आणि केरळमधील अनेक ठिकाणी जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते.

आज महाराष्टड्ढ सरकार हजारो कोटी रूपयांचे पूल, उड्डाणपूल, मेटड्ढो, मोनोचे पकल्प उभारत आहे.  विमानतळासाठी १० हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. मुंबई शहरातच ५५ उड्डाणपूल तसेच समुद्रावरील वरळी ते वांद्रे या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर आता शिवडी ते न्हावाशेवा यादरम्यान २२ किमी लांबीचा भरसमुद्रातून जाणारा भारतातील पहिलाच लांब अंतर असणारा पूल उभारण्याची सिद्धता झाली असून त्यासाठी पर्यावरण आणि अन्य अडचणी दूर केल्या गेल्या असून त्या पुलाच्या बांधकामासाठी आता टेंडरही मागवले गेले आहे.

सुमारे ४५ ते ५० हजार कोटी रूपये खर्चाचे हे परिवहन क्षेत्रतील महापकल्प मुंबईच्या परिसरातच उभारले जात असताना, अवघ्या ५०० कोटी रूपयांच्या खर्चात मुंबई ते मोरा, रेवस यासाठी आधूनिक जलवाहतुकीचा विचारही केला जात नाही. मला पावसाळ्यात माझ्या गावाला जायचे असेल, तर प्रचंड गर्दी व वाहतूक कोंडी असणा-या मुंबई शहरातून चेंबूर, मानखुर्द, वाशी, जुईनगर, बेलापूर, करंबोळी, पनवेल अशा मार्गाने ठाणे आणि रायगड जिल्ह्याला वळसा घालून गेल्यावरच पोहोचता येते. वास्तविक आधूनिक तंत्रज्ञान जलवाहतुकीतील वेगवान बोटी, उपग्रह दळणवळण यंत्रणा या सर्वांचा उपयोग करून या भागात जलवाहतुकीचा भक्कम पाया घातला गेला, तर माझ्याखेरीज या भागातील आगरी आणि कोळी बांधव यांची उपजिवीका आणि भवितव्याच्या दृष्टीनेही ते शासनाचे एक आवश्यक कर्तव्य ठरेल.

- मिनल माळी

No comments:

Post a Comment