महाराष्टातील ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टीवरील जलवाहतूक आणि
व्यापाराची हजारो वर्षपूर्वीची परंपरा आहे. ठाणे जिल्ह्याचा इतिहास आणि त्यातील
प्रमुख घटना लक्षात घेतल्या तर, हजारो वर्षांची परंपरा आणि अनुभव
असलेले आपल्या आगरी आणि कोळी बांधवांना इंग्रजांप्रमाणेच जर त्यांनी धाडस दाखविले
असते, तर आशिया, आफ्रिका आणि जगातील
अन्य देशांवर आक्रमण करून तेथे आपले साम्राज्य प्रस्थापित करता आले असते. असे झाले
असते तर, कोलंबसाने भारताचा शोध घेण्यासाठी केलेला
समुद्रप्रवास आणि त्यानंतर इंग्लंडमधील दर्यावर्दीने अमेरिकेवर प्रस्थापित केलेले
वर्चस्व याऐवजी समुद्रमार्गाने जगाचा शोध घेणा-या बहाद्दर
भारतीय नौसैनिकांनी ब्रिटनसकट अमेरिका गाठून जगारव आपले वर्चस्व आणि साम्राज्य
प्रस्थापित केले असते. इतिहासाला जबरदस्त कलाटणी देणारी ही घटना घडू शकली नाही
याचे कारण नौकानयन किंवा समुद्रभ्रमण हेच काही धर्मशास्त्रांच्या दृष्टीने निषिद्ध
होते. त्याबरोबरच जो काही पराक्रम करायचा आणि युद्ध जिंकायची ती मोठ्या संख्येने
मैदानीच असून त्यासाठी हत्ती, घोडे, रथ
याचा वापर करून रामायण आणि महाभारत काळापासून लढाया खेळल्या गेल्या असल्या तरी,
वानर सेनेने लंका जिंकल्याचा अपवाद सोडला तर, सागरी
मार्गाने जावून विजय मिळविण्याच्या घटना दुर्मिळच म्हणाव्या लागतील.
अगदी पुराणाचा आढावा घ्यायचा झाला, तर त्रेतायुगात
समुद्राच्या लाटा थेट पश्चिम किनारपट्टीवरील सह्याद्रीच्या रांगांना धडक देत असत.
त्यानंतर भगवान परशुरामाने पाशुपतास्त्र सोडून समुद्र मागे हटवला आणि त्यामुळे जी
भूमी निर्माण झाली ती म्हणजे सप्तकोकण. या कोकणभूमीच्या मर्यादा किनारपट्टीला
समांतर असणाèया सह्याद्री पर्वताच्या महाराष्ट आणि गुजरात
प्रांताच्या सरहद्दीवरच्या सिलबाली रांगेपासून थेट दक्षिणेकडचे शेवटचे टोक म्हणजे
कर्नाटक आणि केरळ प्रदेशातील डोंगररांगांमधून जात शेवटी कन्याकुमारीला भरसमुद्रात
असलेल्या ‘श्रीपाद शिला‘ या शेवटच्या
उंचवट्यापर्यंत ही विस्तृत किनारपट्टी पसरली आहे. हा सर्व भाग कोकणभूमी म्हणूनच
ओळखला जात असल्याने आपण संकुचित दृष्टीने वसई ते गोवा याच महाराष्टातील
किनारपट्टीला कोकण म्हणून ओळखत असलो तरी, विशाल
कोकणपट्टीच्या सीमा थेट कन्याकुमारीपर्यंत पोहोचत असल्यामुळे सध्या याच
किनारपट्टीवरून धावणा-या कोकण रेल्वेचे नाव हे ऐतिहासिक आणि
पौराणिक महत्व ओळखून दिलेले आहे.
हा सर्व इतिहास विस्तारपूर्वक ठाणे जिल्ह्याची माहिती मिळवत असताना
ठाणे संघसरिता या पुस्तकात पहिल्याच अध्यायात मल्हार कृष्ण गोखले यांनी दिला आहे.
जरी या पुस्तकाचे महत्व ठाणे जिल्ह्यात संघकार्याचे प्रारंभ आणि विस्तार कसा झाला
या दृष्टीने अत्यंत माहितीपूर्ण असले तरी, हा त्यामुळे ठाणे
जिल्ह्यात नौकानयन आणि जलवाहतुकीच्या दृष्टीने किती प्रगती झाली होती, हे चित्र स्पष्ट होते. ३००० हजार वर्षांपूर्वी चालत आलेल्या या परंपरेचा
वेध घेतला तर, शूर्पारक क्षेत्र म्हणजे आताचा ठाणे जिल्हा
तसेच मुंबई आणि रायगड जिल्ह्याच मोठा भाग. त्यानंतर उत्तर कोकण किंवा कोकण-१४००
अशा आकड्याने त्याचे वर्णन केले जात असे. त्याचा अर्थ असा होता की इतक्या प्राचीन
काळातसुद्धा या भागात १४०० गावे होती. त्यानंतरही शालीवाहन राजाच्या कारकिर्दित
महाराष्टातील पैठण, तेहढोके, मालखेड,
क-हाड आणि कोल्हापूर या सगळ्या व्यापारी
पेठांमधून त्या काळात म्हणजे इ.स. ७८ म्हणजेच सुमारे २००० वर्षांपूर्वी कापूस,
गूळ, मिरी, हस्तीदंत,
तीळ, चंदन, चामडी असा
माल अरबस्तान, इराण, पूर्व आफ्रिका,
ग्रीस आणि रोमपर्यंत जात असे. त्याच देशातून भारतात तांबे, कथील, शिसे, जस्त, सोने आणि अरबी घोडे भारतात येत असत. सर्वांत महत्वाचे म्हणजे ही सगळी
आयात-निर्यात गुजरातच्या समुद्रकिना-यावरील भडोच, नालासोपारा, ठाणे, रेवदंड्याजवळचे
चऊल, कल्याण या बंदरांतून चालत असे. अगदी थेट कोल्हापूर
किंवा पैठणपासून बैलांच्या तांड्याने हा माल बंदरावर यायचा आणि तेथून बोटीने तो
भारताबाहेर पाठवला जात असे.
इ.स. ६३७ साली इस्लामची पहिली टोळधाड सिंध प्रांतावर नव्हे, तर उत्तर कोकणच्या ठाणे बंदरावर कोसळली होती. मात्र महत्वाचे म्हणजे
महम्मद बीन कासिमने सिंधवर केलेल्या स्वारीनंतर तो भाग जिंकून दाहिर राजाला हरविले
होते. मात्र ठाणे बंदरावर अरबांनी केलेले आक्रमण चालुक्य सम्राट सत्याश्रय पुलकेशी
याने आपल्या प्रबळ आरमाराच्या जोरावर परतवून लावले होते. आपण इतिहास शिकत असताना
हिंदू सैन्य आणि राजाने मार कुठे खाल्ला याचेच तपशील लक्षात ठेवतो. मात्र सध्याही
प्राचीन भारतातील आपल्या नौदलाच्या पंरपरेचा अभिमान वाटावा अशी ही घटना आहे. इतकेच
नव्हे तर त्यानंतर शिलाहार राजा यादव घराणे यांनी या भागात राज्य केले. त्या काळात
इ.स. १२ किंवा १३ व्या शतकात पैठण, ठाणे आणि चऊल या शहरांतील
कापडाचे उत्पादन जगभरात प्रसिद्ध असून त्या काळात केवळ ठाणे शहरात ५००० विणकर मखमलीचे
कापड तयार करण्यात गुंतलेले असत. याच शिलाहार राजांपैकी राजा अनंतदेव याचा
व्यापारक्षेत्रात असलेल्या भामणशेट्टींची व्यापारी गलबते सोपारा, ठाणे, चऊल आणि सध्याचे खारेपाठण या बंदरातून
नौकांच्या द्वारे जगभर व्यापार करत असत. याच राजाने मुंबईतील वाळकेश्वर आणि
महालक्ष्मी तसेच सध्या आंबरनाथचे प्रसिद्ध असलेले शिवमंदिर उभारले होते.
ही सर्व प्राचीन परंपरा आणि नौकानयनाचे महत्व लक्षात घेतले, तर केवळ ठाणे जिल्हाच नव्हे तर महाराष्टाच्या किनारपट्टीतील दर्यावर्दी
समाज आणि राजकत्र्यांनी व्यापार आणि संरक्षण या दृष्टीने या क्षेत्रात निर्माण
केलेले जागतिक दृष्टीने महत्वाचे स्थान लक्षात येते. सध्याच्या काळात हवामान,
नौकानयन यासाठी अत्याधूनिक साधने, वायरलेस आणि
संगणक नियंत्रित उपकरणे असली तरी, जलवाहतूक करण्यामध्ये अनेक
अडचणी आहेत. मात्र ३००० वर्षांपूर्वीपासून ते थेट परंपरेने चालत आलेल्या
कोकणपट्टीतील राजकत्र्यांचा इतिहास लक्षात घेतला, तर त्या
काळात समुद्रमार्गाने केवळ पर्यटन किंवा संरक्षणच नव्हे तर जगातील अन्य देशांशी
आपण करत असलेल्या आयात-निर्यातीद्वारे प्रस्थापित केलेले संबंध हे सर्व त्या काळात
करण्यासाठी किती जिद्द, हिंमत आणि नौकानयन क्षेत्रतील
प्राविण्य हे राज्यकर्ते आणि त्यांच्या आरमारांनी प्राप्त केले होते, याचा अंदाज येतो.
अगदी अलिकडच्या काळाचा विचार केला तरी, छत्रपती
शिवाजी महाराजांचे आरमार आणि पेशवाईतील चिमाजी अप्पा याने कोकणपट्टीवरील अलिबाग,
जंजिरा, वसई येथील किल्ले आणि समुद्रकिना-याचे संरक्षण करण्यासाठी उभारलेले आरमार हा पराक्रम अत्यंत प्रेरक आहे.
१६५७ साली शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी जिकली आणि तेथे दुर्गाडी किल्ला
बांधला. त्यानंतर १९७९ साली जंजिरेकर सिद्दी या समुद्री शत्रुचे आरमार मुंबईतील
माझगाव बंदरात असल्याचा सुगावा शिवाजी महाराजांना लागल्यानंतर माझगाववर अचानक छापा
घालून सिद्दीला पळविण्याचा बेत त्यांनी आखला. ही कामगिरी त्यांनी दौलतखान सरदारावर
सोपविली. अर्थात त्या काळात मुंबई बंदराचे संरक्षण करणा-या
ब्रिटिश अधिका-यांनी दोलतखानाला सिद्दीच्या आरमारावर आक्रमण
करण्यासाठी परवानगी नाकारली. परंतु त्याच काळात ब्रिटिशांनी त्यावेळी ठाणे बंदरात
४० लढाऊ मचवे सज्ज ठेवले होते. अर्थात याच काळात प्रथम मुघल आणि नंतर फिरंग्यांचा
धर्मप्रसारासाठी किनारपट्टीतील संचार हा पकार चालूच होता. त्यानंतर १७३७ मध्ये
थोरले बाजीरावांचा धाकटा भाऊ चिमाजी अप्पा हा स्वत: वसईचा किल्ला जिंकायला निघाला
आणि १७३९ च्या मे महिन्यांत चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकून घेतला.
हा सर्व थेट पुरातन काळापासून इंग्रजांच्या कारकिर्दिपर्यंत ख-या अर्थाने भारतीय आरमाराचा आणि
ठाणे जिल्ह्याचा प्रेरक इतिहास ठरतो. त्या दृष्टीने पाहिले तर सध्याच्या काळात
पर्याप्त आधूनिक साधने आणि ब्रिटिशांच्या राजवटीत युद्धनौका, ऑईल टँकर, सध्या कंटेनर वाहून नेणा-या ५० हजार टनापेक्षा जास्त
मालवाहू बोटी ही सर्व प्रचंड प्रमाणावरील समुद्रमार्गे चालणारी जलवाहतूक लक्षात
घेतली, तर खास भारतीय किंवा महाराष्ट आणि विशेषकरून आगरी
आणि कोळी समाज यांचे या क्षेत्रातील योगदान आणि महत्व किती अपुरे आहे, हे लक्षात येते. त्यादृष्टीने पुन्हा एकदा आपली गौरवपूर्ण नौकानयनाची
परंपरा आणि या किनारपट्टीचा एक अविभाज्य भाग असणा-या समुद्रातील नौकानयन आणि
जलवाहतूक क्षेत्रात आपण प्रगती करू शकतो. मात्र त्या दृष्टीने शासन आणि समाज
यांच्यामध्ये जबरदस्त जागृती आणि निर्धार निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
- मिनल माळी

No comments:
Post a Comment