Monday, 6 May 2013

नमस्कार... साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपले स्वागत...

मंगळवार, दि. 16 एप्रिल
काल मला माझ्या सरांचा फोन आला. एक खूशखबर आहे. सरांना दूरदर्शनवरील साडेनऊच्या बातम्यांमध्ये चर्चेसाठी बोलावले होते आणि सरांनी केवळ मलाच सांगितले होते. चक्क मला तिकडे सोबत येण्यासाठी आमंत्रण दिले. मी तेव्हा “सातव्या आसमान”मध्ये होती. वेब जर्नलिजम करताना सगळ्यांना तिकडे नेण्यात आले होते. पण मी तो चान्स मिस केला होता. सरांचा फोन चालूच असताना मला एकच गाणे सुचले, “चलो बुलावा आया है, बाबाने बुलाया है”.... मी त्याच क्षणी “हो” म्हणाले...

रात्रभर मी “खयालो में” होती. खरं सांगायचं तर माझ्या आनंदाला पारावर नव्हता.. रात्रभर एकच विचार मनात फिरत होता, उद्या मला दूरदर्शनवर जायचं आहे आणि तेही “लाईव्ह शो”. मी खूप खूश होते. तेवढ्यात मला आठवलं की, उद्या तर माझं ऑफिस आहे. आता काय करायचं... सरांनी जाऊ नाही दिलं तर... आणि इकडे या सरांना तर मी येणार सांगून मोकळी झाली... काय करायचं... अशा विचारांतच मला झोप कधी लागली कळालंच नाही...

सकाळी नेहमीप्रमाणे मी ऑफिसला गेले. तिकडे सरांना सांगितलं की मला दूरदर्शनवरील एका कार्यक्रमाला जायचं आहे आज, तर मी थोडं लवकर निघाली तर चालेल का... ते नाही बोलणारच नाहीत हे मला ठाऊक होतं. पण तरीही.... आणि मला संध्याकाळी 7 वाजता निघायची परवानगी मिळाली. याह्हू....

लोकल ट्रेन पकडून मी दादरला पोहोचली. तिथूनच आम्ही एकत्र वरळीला जाणार होतो. थोड्याच वेळेत सरदेखील तेथे आले. सरांनी काहीतरी खायला घ्यायला सांगितले. मी माझा आणि लेजचं मोठं पॅकेट घेतलं आणि आम्ही निघालो. खरं सांगायचं तर जर्नलिजम स्टुडंट असूनही मी प्रथमच दूरदर्शनच्या ऑफिसनध्ये गेले होते आणि तेही फक्त सरांमुळेच. प्रचंड ट्रॅफिकमधून आम्ही तेथे पोहोचलो. एखाद्या आलिशान महालासारखे वाटणारे दूरदर्शन केंद्र मला बाहेरूनच खूप आवडले. तिथे पोहोचल्यावर आम्हाला एका केबिनमध्ये बसवण्यात आले. कार्यक्रम सुरू व्हायला खूप वेळ होता. आम्हाला प्यायला थंडगार पाणी देण्यात आले. मी नेहमीप्रमाणे आजूबाजूचं निरीक्षण करू लागली...

थोड्याच वेळात न्यूज रिडर आशुतोष सावे आत आले. सरांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. मला खूप छान वाटलं. त्यानंतर सावे सरांनी सरांच्या हातात एक “प्रश्नावली” दिली. अर्थात त्या कार्यक्रमात नेमके काय प्रश्न विचारणार याची. एकंदरीत ती पद्धत माझ्या लक्षात आली. सरांनी ती व्यवस्थितपणे वाचली. त्यातल्या काही मुद्द्यांवर चर्चा केली. मी हे सगळं नीट पाहत होती. थोड्या वेळात सरांना “मेक-अप” रूममध्ये नेण्यात आले. मी तेथेच बसून राहिली. काही वेळ उलटला. तोपर्यंत माझं बहुतेक निरीक्षण करून झालं होतं...

सर आल्यानंतर आम्हाला थेट स्टुडिओमध्ये नेण्यात आले. मी आत शिरले आणि.... बाप रे..... इतके भलेमोठे कॅमेरे... छोटे-मोठे टीव्ही... भयाण शांतता... इतकी की टाचणीचे उदाहरण सोडा, तिथे असलेल्या प्रत्येकाच्या प्रत्येक हालचालींचे आवाज ऐकू येत होते. मी थोडं पुढे गेली आणि समोरच... जे रोज टीव्हीवर पाहायची ते आज प्रत्यक्षात पाहत होती. भलामोठा टेबल, पलिकडे दोन खुर्च्या आणि पाठीमागे महाराष्ट्राचा नकाशा असलेले “बॅकग्राऊंड”... मी खूप खूश होती. थोड्याच वेळात साडेनऊच्या बातम्या प्रसारित होणार होत्या..

9 वाजून 25 मिनिटे झाली होती. समोरच एका खुर्चीत सावे सर बसले होते आणि त्यांच्या बाजूलाच माझे सर... कॅमेरे आणि मायक्रोफोन वगैरे व्यवस्थित लावून घेण्यात आले. 9.28 झाले. पुढे काय होणार हे पाहण्यास मी फार उत्सुक होते. साऊंड... रोल कॅमेरा... ऍक्शन... “नमस्कार... साडेनऊच्या बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे..”... एक-एक बातमी वाचण्यास सुरूवात झाली. ते कशाप्रकारे होत आहे, मध्येच टीव्हीवर ते दिसतात तर मध्येच एखादा व्हिडीओ... हे सगळं लक्षात यायला मला थोडा वेळ लागला, कारण मी हे सर्व प्रथमच पाहत होते. बातम्या सांगण्यात 10 मिनिटे गेली. आणि मग सरांशी चर्चा... सरांचा रेल्वे विषयावर खूप अभ्यास आहे. नुकत्याच झालेल्या चर्चगेट ते डहाणू या उपनगरीय रेल्वेबद्दल त्यांना बोलायचे होते. तशी चर्चा सुरू झाली. तीही 10 मिनिटे चालली...

आज प्रथमच मला एखाद्या न्यूज चॅनलवरील लाईव्ह शो पाहायला मिळाला. माझ्या निरीक्षणातून मला एक गोष्ट कळाली. न्यूज चॅनलमध्ये एक-एक सेकंद महत्वाचा असतो. आणि म्हणूनच त्यांचे कार्यक्रम यशस्वी आणि वेळेत पार पडतात. वेळ किती महत्वाची असते हे त्यांच्याकडून शिकायला मिळते. अशाचप्रकारे आपणही आपल्या आयुष्यात वेळेला महत्व दिले तर आपलीदेखील प्रत्येक कामे यशस्वीरित्या पार पडतील. चला तर मग, वेळेचे योग्य नियोजन करून कामाला लागू या.... यश तुमचेच आहे...

- मिनल माळी

1 comment: