Monday, 25 February 2013

महिलांवर होणारे घरगुती हिंसाचार



महिलांवर होणा-या अत्याचारात दिवसागणिक वाढ होत आहे. आजही विवाहित महिलांचा हुंड्यासाठी सासरची मंडळी मानसिक किंवा शारीरिक छळ करीत आहेत. त्यात महिलेला धमकविणे, जाळून मारणे, माहेरी पाठविणे, घरात कोंडून ठेवणे, मानसिक त्रास देणे असे प्रकार होत असतात. याच्याविरोधात कितीही आवाज उटवला तरी ही पद्धत आजपर्यंत बंद झालेली नाही. आजही देशात अनेक ठिकाणी हुंडा पद्धत चालू आहे. त्यामुळे अनेक महिलांचा नाहक बळी जात आहे. काही महिला त्याविरोधात आवाज उठवतात व हुंडा मागणाèयांना धडा शिकवितात. परंतु काही महिला सासरच्यांचे अत्याचार सहन करतात, शेवटी त्यांना मारले जाते किंवा त्या आत्महत्या करतात. हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत. परंतु अनेक जणांना ते अद्यापही माहित नाहीत. तर काहींना माहित असूनदेखील ते त्याचा उपयोग करीत नाहीत.

या ठिकाणी दोन घटना मला सांगाव्याश्या वाटतात. एक शिक्षित मुलगी लग्न करून सासरी जाते. काही दिवस व्यवस्थित जातात. परंतु लग्नानंतर काही महिन्यांतच तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकण्यात येतो. व्यवसायाने डॉक्टर असलेली ती महिला याच्याविरुद्ध आवाजही उठवू शकली नाही. तिला तिच्या सासरची मंडळी दररोज त्रास देत असत. तिचा मानसिक छळ करीत असत.  परंतु तिने याबद्दल कोणालाही सांगितले नाही. शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. दुस-या घटनेत देखील विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ होत असतो. परंतु तिच्याही सासरच्या मंडळींना हुंडा मिळत नाही. याच गोष्टीचा राग मनात धरून सासरच्या मंडळींनी तिला घरातील एका खोलीतच बांधून जाळून टाकले. दोन्ही घटनांमध्ये महिलेचा मृत्यू झाला. कोणीही याविरोधात आवाज उठविला नाही qकवा सासरच्यांविरुद्ध तक्रार नोंदविली नाही.

देशात काही ठिकाणे सोडली तर अनेक राज्यांमध्ये आजही हुंडा घेतला जातो. काहीजण तर केवळ पैशासाठीच लग्न करतात व लग्नानंतर हुंड्यसाठी महिलेला त्रास देतात. तिचा मानसिक तसेच शारीरिक छळ करतात. पैसे मिळाले की काही कारणास्तव तिला सोडून देतात व त्यानंतर दुसरे लग्न करतात. काही ठिकाणी हुंडा म्हणजे एक प्रकारचा व्यवसायच बनला आहे. यातूनच पुढे स्त्रीभ्रूण हत्येला सुरूवात होते. कारण काही लोकांना हुंडा घ्यायची माहिती असते, द्यायची नाही. त्यामुळे आपल्या घरात केवळ मुालंनीच जन्म घ्यावा, असा त्यांचा आग्रह असतो. या सर्व प्रकारात जर महिलेने आवाज उठविला, तर तिच्यावर अत्याचार होतो.

अशा महिलांनी वेळीच आपले आयुष्य सांभाळले पाहिजे. जर आपल्या सासरची मंडळी हुंड्यासाठी मागणी करीत असतील, तर तिने त्यांच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली पाहिजे. तसेच जर तिचा घरी छळ होत असेल, तर तो सहन न करता त्याविरूद्धही आवाज उठविला पाहिजे. तसेच जर अत्याचाराची पातळी खूपच वाढली असेल, तर जबरदस्ती आपले आयुष्य अशा व्यक्तीसोबत न घालवता, योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हुंड्याविरोधात भारतीय दंड विधानात अनेक कायदे आहेत. भा.दं.वि. ३०४ बी, ४९८ ए आदी कायद्यांतर्गत एखादी पीडित महिला तिच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करू शकते. लग्नानंतर सात वर्षाच्या आत जर एखाद्या महिलेचा मृत्यू झाला, तर ती हत्या समजण्यात येऊन, ही हत्या हुंड्यासाठी केल्याचे मानले जाते. त्यामुळे तिच्या पतीला ही हत्या नसून आकस्मिक मृत्यू असल्याचे त्याच्याबाजूने सिद्ध करावे लागेल. तसे न केल्यास त्याच्यावर हुंड्यासाठी पत्नीचा खून केल्याप्रकरणी भादंवि ३०४ बी अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. तसेच लग्नानंतर विवाहितेचा तिच्या सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला, तर त्यांच्याविरोधात भादंवि ४९८ ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो.

असे अनेक कायदे भारतीय दंड विधानात आहेत. महिलांनी ते जाणून घेवून त्यांचा योग्य वेळी वापर केला पाहिजे. परंतु सर्वच नसल्या तरी काही महिला अशा देखील असतात, ज्या पैशासाठी सासरच्यांविरुद्ध खोटी तक्रार दाखल करतात आणि या कायद्यांचा गैरवापर करतात. या सर्वाचा चुकी नसतानाही सासरच्यांना त्रास सहन करावा लागतो. अशा काही अपवादात्मक घटना सोडल्या तर, देशात अनेक ठिकाणी हुंड्यासाठी महिलांवर अत्याचार केला जातो. हे कायदे अशा महिलांसाठी असून, त्यांनी न घाबरता या कायद्यांचा वापर करून आपले आयुष्य सुखकर बनविले पाहिजे.

- मिनल माळी

No comments:

Post a Comment