Monday, 15 April 2013

फुल्ल टू धमाल....


शनिवार दि. 13 मार्च 2013
आज नेहमीप्रमाणे सरांचा मेसेज आला. “श्रीरणसुबे” सरांचा लेक्चर आहे, संध्याकाळी 6 वाजता. मी 5 वाजताच घर सोडले आणि अवघ्या अर्ध्या तासांतच मी सीएसटी स्टेशनला पोहोचले. दिवसभर थकलेली मी चालत-चालत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या गेटजवळ पोहोचले. पाहते तर काय.... कधी ऐकलेही नव्हते ते पाहावयास मिळाले.... पत्रकार संघ चक्क बंद.... आणि बाहेर कीर्ती मॅडम, श्रीराम, विठोबा असे दोघे-तिघे उभे होते. मी उत्सुकतेने विचारले, लेक्चर नाही का आज...? श्रीरामने उत्तर दिले, आतला बोर्ड वाच....

मी तो बोर्ड वाचला. त्यात लिहिले होते की, काही कारणास्तव पत्रकार संघ सोमवारपर्यंत बंद... मला खूप वाईट वाटले. माझ्या आळशी मनात एकच विचार आला, छे.. उगाच आली अशी धावपळ करत.. थोडी झोपली तरी असती घरी... मग सुनिल सरांना कॉल केला. नो रिस्पॉन्स.. मग मेसेज केला... तेवढ्यात चैताली आली. तिनेसुद्धा तेच विचारले. आता मात्र श्रीरामच्या जागी मी होते...

काय करायचं आता... तेवढ्यात सुनिल सरांचा मला फोन आला... त्यांना सर्व हकिकत सांगितली. त्यांनी दुःख व्यक्त करत लेक्चर कॅन्सल झाल्याचं सांगितलं.... फोन ठेवून झाल्यावर मीच ही खुशखबरी सर्वांना दिली. पण उगाच आलो एवढ्या लांबून... असे बोलणा-यांसाठी काही करता येईल का याचा जरा विचार केला. चैतालीने सुचवल्याप्रमाणे आम्ही पुन्हा सुनिल सरांना फोन लावला...

ट्रिंग... ट्रिंग... हॅलो, सर... मी चैताली... आजचं लेक्चर तर कॅन्सल झालं, पण इथे भरपूर जण आलेत... आणि आलोच आहोत तर तुमचा आणि कीर्ती मॅडमचा वाढदिवस साजरा करायचा विचार करतोय आम्ही... चैतालीने ‘गुगली’ टाकली... सर... सर... प्लिज... या ना... “परेलकरांचं” तरी ऐका... मी जोड दिली...आता काय... येण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि सरांनी “कुबुल है” म्हणत होकार दिला... आम्ही सगळे जाम खूश.... मध्ये कीर्ती मॅडम म्हणाल्या की नको सरांना उगाच त्रास... पण आम्ही समजावलं त्यांना की आता नाही तर मग कधी.... आणि बोलता-बोलता अर्ध्या तासांतच सर पोहोचले. ते आल्यानंतर आम्हाला समजलं की सर त्यांची “झोप” मोडून आमच्यासाठी तेथे आले होते. खूप वाईट वाटलं मला तेव्हा... झोपेची किंमत माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळणार.... असो... पण सर असावे तर असे...

काय करायचं... कुठे जायचं... ठरवण्यात थोडा वेळ गेला. मरीन ड्राईव्ह की प्रेस क्लब... आमच्या क्लासमधली नव“नीता” म्हणजेच नीता मोहिते अजून यायची बाकी होती. त्यामुळे आम्ही प्रेस क्लबचा पर्याय निवडला... चैताली प्रथमच आली होती आणि आम्ही सर्व दुस-यांदा... तिला चिडवतच आम्ही प्रेस क्लबच्या टेरेसवर गेलो... नेहमीप्रमाणे दोन टेबल जोडून आम्ही बसलो. अर्थात व्हेज-नॉनव्हेज याप्रमाणे... तिथे सगळी कार्यपद्धता “स्लो” असल्यामुळे आम्ही ऑर्डर दिली... थोड्या वेळातच आम्ही ऑर्डर केलेल्या डिश टेबलावर आल्या... चिकन क्रिस्पी, चिकन मंचुरियन असे चिकनचे जवळजवळ 7-8 पदार्थ आमच्यासमोर ठेवण्यात आले...आणि व्हेजमध्ये व्हेजमंचुरियन आणि आणखी 4-5 पदार्थ आले... तेवढ्यातच आमची नव“नीता” आली... सर्वांनी बोलता-बोलता आलेल्या पदार्थांवर ताव मारण्यास सुरूवात केली... बोलायला वेगवेगळे विषय सुरू झाले... परीक्षा कधी व कशी होणार... यावरून चैतालीने सुरूवात केली. मग सरांनी ते काय नक्की नसल्याचे सांगत आपली “वेब जर्नलिस्ट”ची वेबसाईट आपण चालू ठेवूया का, त्यातून तुमची प्रॅक्टिसपण होईल... असे सांगितले. कसं करायचं ते ठरवतंच आम्ही होकार कळवला...

खाता-खाताच नीता म्हणाली, सर आपण एक पिकनिक काढूया का ? आमच्या सर्वांचा आवडीचा विषय... सर थोडे हसले आणि म्हणाले, कुठे जायचं ? इकडे-तिकडे, हो-नाही म्हणता म्हणता “अलिबाग” हे ठिकाण नक्की झालं... आणि तेही चक्क एक दिवस, एक रात्र... सर्वांच्या मनातली इच्छा आणि नात्यातील लग्नांच्या तारखा लक्षात घेवून 4 मे या दिवसावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण अजूनही खूप प्रश्न बाकी होते... जायचं कसं... राहायचं कुठे... खायचं काय....

आम्ही विचार करतच होतो, इतक्यात ममताचा आवाज आला. माझ्या काकांचा बंगला आहे तिकडे... माशाअल्ला... मग काय... सगळेच खूश... पण ती जागा अलिबागपासून फार दूर असल्याने आम्ही थोडा विचार करू लागलो... अर्थात माझे गावच अलिबाग असल्याने ती जबाबदारी मी घेतली... आमचे घर मोठे असून अलिबागपासून अवघ्या 8 ते 10 किमी अंतरावर एक फार्म हाऊसपण असल्याचे मी सांगितले... राहण्या-खाण्याची शिवाय गाडीची व्यवस्था होऊ शकते, असे सांगितले... आणि काय... सगळे एकदम स्वप्नांच्या दुनियेत....

पिकनिकचाच विषय डोक्यात घेवून आम्ही प्रेस क्लबच्या बाहेर पडलो... त्या दिवसाचं लेक्चर तर कॅन्सल झालं, पण घरी न जाता सरांना बोलावून घेतल्याचा फायदा झाला... याच गोष्टीचा आनंद आणि समाधान घेवून सगळे आपापल्या घरी निघून गेले... पर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त... मग विचार कसला करताय....? येणार ना अलिबाग पिकनिकला....?

- मिनल माळी

No comments:

Post a Comment